अहिल्यानगर-काठ्या, गज, लोखंडी रॉड व कुर्हाडीने तरूणावर हल्ला केल्याची घटना मंगळवारी (26 नोव्हेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास नगर तालुक्यातील साकत शिवारात मुंगसे वस्तीवर घडली. मारहाणीत अनिल राजू मुंगसे (रा. मुंगसे वस्ती, साकत) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक राजू मुंगसे (वय 20 रा. मुंगसेवस्ती, साकत) यांनी फिर्याद दिली. प्रवीण शंकर पवार, अक्षय शंकर पवार, शंकर मुरलीधर पवार, बंडु बाबुराव निमसे, गणेश बंडु निमसे, अभिषेक अर्जुन निमसे, सागर अशोक मुंगसे (सर्व रा. साकत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दीपक मुंगसे हे त्यांच्या शेतातील कांद्याच्या रोपाला पाणी भरत असताना संशयित आरोपी काठ्या, गज, लोखंडी रॉड, कुर्हाड घेऊन तेथे आले. त्यांनी अनिल मुंगसे यांच्यामागे पळत जावून त्यांच्यावर रॉड, काठ्या, गज, कर्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात अनिल जखमी झाले आहेत. त्यांनी फिर्यादी दीपक व अनिल यांना शिवीगाळ करून ‘तू परत जर भेटला तर तुला मारूनच टाकतो’ अशी धमकी दिली. जखमी अनिल यांच्यावर अहिल्यानगर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सात जणांनी त्यांच्यावर कोणत्या कारणातून हल्ला केला याची माहिती समजू शकली नाही. अधिक तपास पोलीस अंमलदार वांढेकर करत आहेत.