अहमदनगर-श्रीरामपूर-तालुक्यातील गोंडेगाव येथील एका अल्पवयीन मुलाला त्याच्या जातीबद्दल अपशब्द बोलून, त्याला भिती दाखवून त्याचे धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मौलानासह एका जणावर अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील गोंडेगाव येथील राजेंद्र लोखंडे यांचा तेरा वर्षांचा मुलगा सार्थक राजेंद्र लोखंडे हा अल्पवयीन असल्याचे माहिती असताना, त्याच्या वयाचा फायदा घेऊन येथील एका समाजाच्या मौलाना व गावातीलच बादशाहा ऊर्फ शोएब शकील सैय्यद यांनी त्याला फुस लावून मुस्लीम धर्मात येण्यासाठी नमाज व अजाण शिकविले. शिकविलेले नमाज व अजाण रोज करण्यास सांगून, नाही केले तर त्याच्या जातीचा उल्लेख करून तुमच्या एकट्या घराला संपवून टाकू अशी धमकी दिली. तसेच हे घरच्यांना सांगितले तर तुला दोरीने बांधून ठेऊ, नाहीतर तुझ्यासह तुझ्या घरच्यांना जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली.
याप्रकरणी राजेंद्र लोखंडे यांनी तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरुन येथील मौलाना (नाव माहीत नाही) व बादशाहा ऊर्फ शोएब शकील सैय्यद याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंडेगाव येथे काही दिवसापूर्वीच आराध्य दैवत श्री गणपती मदिरांच्या चौथर्यावर काळ्या पिशवीत मांस आढळल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे संतप्त गावकर्यांनी गाव बंदची हाक दिली होती. त्यानंतर कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाने केली नाही. या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे गावकरी आणखी आक्रमक झाले. चौकशीअंती तपासाचे चक्रे फिरवून काही व्यक्तीचे पोलीस प्रशासनाने जबाब नोंदविले त्यावरून हा प्रकार उघडकीस आला.