अहमदनगर-सावेडी उपनगरातील मनमाड रस्त्यावर डी मार्ट शेजारी असलेल्या 10 गुंठे जागेवरील कंपाउंड, पत्र्याच्या शेडचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान करून ताबा मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (19 ऑगस्ट) दुपारी घडला. याप्रकरणी मयुर राजेंद्र कटारीया (रा. रामचंद्र खुंट, नगर) यांनी काल, मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सात ते आठ व्यक्तींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे आजोबा नतमल प्रेमराज कटारिया व त्यांचे मित्र सोमनाथ शामराव देवळालीकर यांनी दोघांनी मिळून 1994 साली मनमाड रस्त्यावर सर्व्हे नंबर 241/अ/4 येथे 10 गुंठे जमीन खरेदी केलेली आहे. दरम्यान, 2004 मध्ये फिर्यादीचे वडिल मयत झाल्याने सदर जमिनीला फिर्यादीचे वडिल राजेंद्र कटारीया, चुलते रशीक कटारीया, संजय कटारीया, आत्या मंगल चोपडा व नूतन काठेड हे सर्वजण वारस लागले. त्या जमिनीशेजारी मन्नु शेरा कुकरेजा, भरत कुकरेजा, राजेश कुकरेजा यांची देखील जमीन आहे. त्यांच्याकडून फिर्यादीच्या जमिनीवर वारंवार अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्यांनी 2023 मध्ये मोजणी करून पत्र्याचे कंपाऊंड केले. सदर ठिकाणी सीसीटीव्ही बसून व्यवसायाकरिता दोन पत्र्याचे शेड उभे केले व सुरक्षेकरिता दोघांना ठेवले आहे.
दरम्यान, सोमवारी दुपारी 12:45 वाजेच्या सुमारास अनोळखी सात ते आठ व्यक्तींनी फिर्यादी यांच्या जमिनीवर येत कंपाउंड, पत्र्याचे शेड, सीसीटीव्ही व इतर साहित्याचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.