अहमदनगर-घरावर ताबा घेऊन ते जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचा प्रयत्न सावेडी उपनगरात मंगळवारी (दि. 19) दुपारी झाला. पती- पत्नीला व मुलाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आले. याप्रकरणी पीडित महिलेले बुधवारी (दि. 20) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाराम हरूमल हिरानंदाणी (रा. सिव्हील हाडको), संतोष रामकृष्ण नवगिरे (रा. माधवनगर, कल्याण रस्ता), करण खंडू पाचारणे (रा. नागापूर एमआयडीसी), राहुल अनिल झेंडे, आकाश रवींद्र औटी (दोघे रा. सिध्दार्थनगर), रणजित देवराम वैरागर (रा. लालटाकी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी महिला सावेडी उपनगरात राहतात. त्या राहत असलेल्या प्लॉटचा एकत्रित वडिलोपार्जित मिळकतीचे वाद चालू असून राहत्या घराचा ताबा घेण्यासाठी फिर्यादीच्या मुलाला धमकी येत होत्या.
यासंदर्भात त्यांनी तोफखाना पोलिसांत तक्रार केली होती. बुधवारी दुपारी फिर्यादी व त्यांचे पती घरी असताना गंगाराम हिरानंदाणी व इतरांनी अचानक घरात प्रवेश केला. घर आम्ही विकत घेतले आहे, तुम्ही या घराच्या बाहेर निघा, आम्ही जेसीबी आणले असून आम्ही हे घर पाडणार आहोत, असे म्हणून फिर्यादी, त्यांचे पती व मुलाला शिवीगाळ करत लाकडी दांडके, सिमेंट ब्लॉक, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्यांना घराबाहेर काढून दिले.खिडक्यांवर दगडफेक करून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास ए.ए.गिरीगोसावी करीत आहेत.