योध्येतील श्रीराम मंदिर आणि वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु होते. त्यावेळी इक्बाल अंसारी यांच्याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण बाबरी मशीदकडून ते पक्षकार होते. 2016 मध्ये 95 वर्षीय हाशिम अंसारी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा असलेल्या इक्बाल यांनी न्यायालयात हे प्रकरण चालवले. आता इक्बाल अंसारी यांची भूमिका बदलली आहे.. राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. त्या कार्यक्रमास ते गेले होते. आता राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्यास आपण जाणार आहोत, असे इक्बाल अंसारी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.
राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले तर आपण जाणार आहोत. अयोध्येत आता हिंदू मुस्लिम वाद राहिला नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य केला आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आहे, यासाठी अयोध्येचा नागरिक म्हणून मलाही अभिमान आहे. अयोध्येत आता कधीच हिंदू, मुस्लिम दंगे होणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला अन् अयोध्येत मंदिर उभे राहिले. आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असे बाबरीचे पक्षकार इक्बाल अंसारी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.