नगर : ‘आता उद्धव ठाकरेंच्या सेनेला माझी गरज नाही असं माझ्या लक्षात आलं. जिथं आपली गरज आहे तिथं गेलं पाहिजे म्हणून मी आता शिंदे गटात प्रवेश करत आहे. नऊ महिन्यांपासून माझ्यावर जो अन्याय झाला त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला जितके प्रयत्न करता येतील तितके मी केले. उपनेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला तरीही मला कुणी विचारलं नाही. मिलींद नार्वेकर, त्याचंच सगळे ऐकत आहेत. नार्वेकर बोलतात तेच सगळं ऐकलं जातं. शिवसेनेची आतापर्यंत जी काही वाताहत झाली ती नार्वेकरांमुळेच झाली आहे’, अशा शब्दांत माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.
आज माजी मंत्री बबनराव घोलप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्याआधी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपण ठाकरेंची शिवसेना का सोडत आहोत याचा खुलासा केला.
मला शिर्डी लोकसभेसाठी तयारी करण्याचे सांगितले होते. अर्थात हे सगळं न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होतं. तेही मला मान्य होतं. पण, नंतर मला अचानक संपर्कप्रमुख पदावरून काढून टाकण्यात आलं. मला काही सांगितलं नाही. तिथं उमेदवार दुसरा दिला. त्याला फिरायला सांगितलं. मला टाळायला लावलं ते काही मला पाहवलं नाही आणि मी माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. मला सहानुभूती मिळाली नाही त्यामुळे आज अखेर मला हा निर्णय घ्यावा लागला.