राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. आपण राष्ट्रवादीला कंटाळून भाजपाबरोबर गेलो होतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्हाला काम करू देत नाही, असाच सूर होता. आता भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केल्याने भाजपाला साथ देणे चुकीचे ठरल्याची भावना अनेक आमदारांची आहे,” अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. बच्चू कडू यांचा नाराजीचा सूर अजूनही कायम आहे.
महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. परंतु महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद दिलेलं नाही. त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याचं बोललं जात आहे. बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांना आमदारांमधील नाराजीबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, कोणताही आमदार आस लावून बसलेला नाही. आम्ही काय पिशवी घेऊन बसलोय का? वाटून टाकायला मंत्रिपद काय भाजीपाला आहे का? मुळात कोणी पिशवी घेऊन बसणार आहे का? असे उलट प्रश्न करत बच्चू कडू यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.