आगामी काळात अजित पवार यांचे अर्धाहून आधिक आमदार हे शरद पवार गटात जातील, असा दावा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या श्रेयावादाच्या लढाईवरही त्यांनी भाष्य केलं आहे. बच्चू कडू यांनी आज अमरावतीत टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.
“आगामी काळात अजित पवार यांचे अर्धाहून आधिक आमदार हे शरद पवार गटात जातील. काही दिवसांनी अजित पवारदेखील तिकडे दिसू शकतात. त्यांना कुणीही अडवलेलं नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कुणाच्या पारड्यात जाऊन बसायचं किंवा कुणाबरोबर राहायचं, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या श्रेयावादाच्या लढाईवरही भाष्य केलं. “राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे श्रेयवादाची लढाई होणारच आहे. ते संयुक्तीक आहे. भाजपा म्हणतंय की लाडकी बहीण योजना आम्ही आणली, शिंदे गट म्हणतंय आम्ही आणली आणि अजित पवार यांचा पक्षही म्हणतोय की ती योजना आम्ही आणली. पण ही लाडकी बहीण योजना कुणी आणली, हे त्यानांच ठरवायचं आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.