नगर तालुक्याच्या राजकारणात स्व. गुलाबराव काळे यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा तालुक्याच्या कानाकोपऱ्यात दांडगा जनसंपर्क होता. नगर शहरात ही त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. स्व. काळे यांच्या निधना नंतर काळे यांच्या घरी भेट देत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काळे कुटुंबीयांचे आ. थोरात यांनी सांत्वन केले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रा. पोपटराव काळे, पाटबंधारे पतसंस्थेचे माजी चेअरमन व मराठा पतसंस्थेचे विद्यमान संचालक बाळकृष्ण काळे, दिलीपराव काळे, ॲड. नितीन काळे, राजाबाबू पाठक, छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा.आदित्य काळे, इंजि. अक्षय काळे, काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन गुंजाळ आदींसह काळे कुटुंबीय, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. थोरात यावेळी म्हणाले, गुलाबरावांनी राजकारणाकडे केवळ राजकारण म्हणून न पाहता त्यातून समाजाचं भलं कसं करता येईल हा दृष्टिकोन ठेवून काम केले. पारनेर तालुक्यातील वनकुटे पंचक्रोशीच्या परिसरामध्ये सुमारे २७०० एकर पडीक जमिनीवर पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करताना त्यांनी वीस लाख झाडांची लागवड लोकसहभागातून केली. या उपक्रमाची माहिती समजल्यानंतर दिवंगत नेते गोविंदराव आदिक आणि मी प्रत्यक्ष भेट देऊन केलेले काम पाहिले होते. जिद्द आणि चिकाटीने त्यांनी गावा-गावातील लोकांना एकत्र करत एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेली यशस्वी वृक्ष लागवड राज्य शासनाच्या ही नजरेत त्यामुळे आली.
म्हणूनच त्यांचा महाराष्ट्र शासनाने मानाचा वृक्षमित्र पुरस्कार देऊन सन्मान देखील केला होता. याचा आम्हा सर्वांनाच अभिमान आहे. त्यांनी त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे मोठा मित्रपरिवार जमवला होता. त्यांची सहजपणे कोणाशी ही पटकन मैत्री व्हायची. त्यांनी जोडलेला मित्रपरिवार कायम त्यांच्याबरोबर राहिला. नगर तालुक्यासह नगर शहरातील त्यांनी जोडलेली असंख्य माणसं शहर काँग्रेसच नेतृत्व करणारे त्यांचे चिरंजीव किरण काळे यांना गुलाबरावांचा राजकीय, सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी निश्चितपणे बळ देतील, असा विश्वास यावेळी आ. थोरात यांनी व्यक्त केला.