महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच, महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या बड्या नेत्यानं मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडी १८० जागांवर विजयी होईल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. ते यवतमाळमध्ये बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी तर दौरेही सुरू केले असून, अप्रत्यक्षरित्या प्रचाराचा नारळही फोडला आहे. त्याचवेळी महायुतीतील पक्ष आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपांबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा सुरू करत आहोत. लवकरच आम्ही आमच्या जागा निश्चित करण्यासंदर्भात निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. महाविकास आघाडीच्या १८० पेक्षा जास्त जागांवरील उमेदवारांचा विधानसभेत विजय होईल, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.