Tuesday, February 11, 2025

बाळासाहेब थोरात यांचा पराभव धक्कादायक, निवडणूक आयोगावर काँग्रेसचे गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीचा निकाल अनाकलनीय : माजी आ. मोहन जोशी ;

निवडणूक आयोगावर काँग्रेसचे गंभीर आरोप, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची निवेदनाद्वारे केली मागणी

प्रतिनिधी : महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसते. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा महायुतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते. महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. अवघ्या सहाच महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. निवडणूक आयोगाने आपल्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

अहिल्यानगर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले. त्याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. याबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत जोशी यांनी माहिती दिली. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ज्येष्ठ नेते घन:श्याम शेलार, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष अनिस चुडीवाला, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माथाडी काँग्रेस विभाग अध्यक्ष विलास उबाळे, मागासवर्गीय विभाग प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे, अल्पसंख्याक प्रदेश पदाधिकारी निजाम जहागिरदार, महिला काँग्रेस उपाध्यक्ष आशाताई लांडे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोहन जोशी म्हणाले की, निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. राज्यघटनेने आयोगाला मोठे अधिकार दिलेले आहेत. देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी आयोगाची आहे. निवडणुकीत मतदार हा राजा असतो. परंतु मागील काही वर्षातील आयोगाची भूमिका पक्षपाती दिसत आहे.

सहाच महिन्यात ५० लाख मतदारांची वाढ कशी ? :
यावेळी जोशी यांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले, मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला. या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहाच महिन्याच्या अंतरात तब्बल ५० लाख मतांची वाढ कशी झाली ? यामागील सत्य जनतेसमोर आले पाहिजे.

ते ७६ लाख मतदान अचानक कसे वाढले ? :
मतदाना दिवशी संध्याकाळी ५.०० वाजता जाहीर केलेली व आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे. यातही ७६ लाख मतदान वाढलेले दाखवले आहे. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था होती. त्यामुळे मतदार यादीतील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले ७६ लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अचानक एवढ्या मोठ्या संख्येने मते वाढली कशी, असा सवाल यावेळी मोहन जोशी यांनी केला. लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे काँग्रेसने केली असल्याचे जोशी यावेळी म्हणाले.

मागील सलग ४० वर्ष बाळासाहेब थोरात हे राज्याच्या विधानसभेत जनतेच्या भरघोस पाठिंब्याने निवडून जात होते. त्यांची सतत सर्वसामान्य माणसाशी असणारी बांधिलकी, संवाद, थेट संपर्क अत्यंत मजबूत होता. अनेक वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले. त्या माध्यमातून आपल्या मतदारसंघांमध्ये भरघोस निधी आणत विकास कामांचा डोंगर त्यांनी उभा केला होता. असे असतानाही त्यांचा पराभव हा धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. अजूनही संगमनेर विधानसभा मतदारसंघासह राज्याला थोरात यांचा पराभव हे न उलगडलेले कोडे असल्याचे यावेळी माजी आमदार मोहन जोशी म्हणाले. एक प्रकारे अप्रत्यक्षरीत्या त्यांनी निवडणुक प्रक्रियेतील पारदर्शकते बद्दल संशय यावेळी व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles