अहमदनगर -कोविडपासून आर्थिक कंबरडे मोडलेल्या जिल्ह्यातील उत्तर भागातील पेट्रोल पंप चालकांचे आर्थिक गणित आणखी बिघडणार आहे. जिल्हा प्रशासनाने नगर ते कोपरगाव रस्त्यावरील अवजड वाहतूक आठ दिवस बंद केल्यामुळे या रस्त्यावरील सुमारे 40 पेट्रोल पंप चालकांना विनाकारण मोठा आर्थिक दणका बसणार असून त्यांच्या व्यवसायात 70 टक्क्यांपर्यंत घट येणार आहे. याबाबत जिल्हा पेट्रोल पंप चालक संघटना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांची कैफियत मांडणार आहेत.
नगर-मनमाड रस्त्याची साडेसाती संपण्याची चिन्हे नाहीत. या रस्त्याची दुरूस्ती गेल्या काही वर्षापासून रखडली असून यामुळे या रस्त्यावर असणार्या चहा टपरी चालक ते पेट्रोल पंप चालकांपर्यंत सर्वच व्यवसायिक अडचणीत आले आहेत. आधी रस्त्याचे काम रखडल्यामुळे त्यानंतर दोन वर्ष कोविडमुळे या रस्त्यावरील पेट्रोल पंपचालक आर्थिकदृष्ट्या मेटाकूटीला आले आहेत. रस्त्याचे काम रखडल्याने आधी जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील प्रवासी, माल वाहतूक करणारी वाहने वेगवेगळ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करत असल्याने त्याचा पेट्रोलसह या मार्गावर असणार्या सर्व व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे.
त्यातच आता हा रस्ता मोठ्या आणि अवजड वाहतुकीसाठी आठ दिवस बंद राहणार असल्याने या रस्त्यावर असणार्या सुमारे 40 पेट्रोल पंप चालकांचे आर्थिक कंबरडे आता पूर्णपणे मोडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. आधीच 2015 पासून पेट्रोल पंप चालक जुन्य कमिशनवर पेट्राल, डिझेलची विक्री करत आहेत. दुसरीकडे विज बिलासह मनुष्यबळाची दर ही दुप्पट वाढलेले आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर गगनला भिडलेले असतांना पंप चालकांच्या समस्या आणि आर्थिक गुंतागुंतीकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचे पंप चालक संघटनेचे म्हणणे आहे. त्यातच आता या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय म्हणजे पंप चालकांच्या दुखावर मिठ चोळण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया या व्यवसायात असणार्यांकडून व्यक्त होत आहे. यामुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचे पंप चालक संघटनेकडून सांगण्यात आले.
गुगलने नगर-कोपरगावचा नाद सोडला
जगभर रस्ते वाहतुकीचा मार्ग दाखवणार्या गुगल मॅपने देखील नगर-मनमाड रस्त्यावर कोपरगावपर्यंत मार्ग दाखवणे बंद केले आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे, जाण्यासाठी लागणारा जादाचा वेळ, सततची वाहतूक कोंडी यामुळे गुगल मॅप देखील नगर-कोपरगाव रस्त्याऐवजी आता पर्यायी मार्ग दाखवत असल्याची संतप्त प्रतिक्रिया या मार्गावरून प्रवास करणार्या एका बाहेरच्या राज्यातील प्रवाशाने नोंदवली. यामुळे नगर- कोपरगाव रस्त्याचा नाद आता गुगल मॅपने देखील सोडला असल्याचे समोर येत आहे.
नगर ते कोपरगाव रस्त्यावर सुमारे 35 ते 40 पेट्रोल पंप कार्यरत आहेत. याठिकाणी सरासरी दिवसाला 5 हजार लिटर डिझेल, तर दीड हजार लिटर पेट्रोलची दररोज विक्री होते. त्यात अवजड वाहतूक बंदीच्या निर्णयामुळे 70 टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे. यामुळे याचा मोठा फटका पेट्रोल पंप चालक – मालकांना बसणार आहे. यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असणार्या पंप चालकांच्या अडचणी वाढणार आहेत.
– चारूदत्त पवार, अध्यक्ष पेट्रोल पंप चालक संघटना, नगर जिल्हा.