अहमदनगर :अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे सभासद ठेवीदारांची आनंदाची बातमी आहे. शिक्षक बँक आता त्यांच्या मोबाईलमध्ये येणार आहे. बँकेच्या मोबाईल ॲपचे उदघाटन आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते शनिवारी (ता.२२) लोकार्पण होईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रामेश्वर चोपडे यांनी दिली.
शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सहकार भारतीचे सचिव मधुसूदन पाटील, तसेच कोकण विभागाचे सहप्रमुख राजू ठाणगे व शिक्षक संघांचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.शिक्षक बँकेने आतापर्यंत सभासदहिताच्या अनेक योजना राबविल्या. त्या राज्याला दिशादर्शक ठरल्या. बँकेने मोबाईल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे सभासद व सर्वसामान्य जनतेला आरटीजीएस एनईएफटी व मनी ट्रॅंजेक्शनसारखे व्यवहार करता येतील. भविष्यात भारत बिल पेमेंट सुविधामार्फत ऑनलाईन प्रकारचे सर्वच व्यवहार ॲपवरून होतील.
आगामी काळामध्ये बँकेच्या सभासदांचे कर्जरोखेदेखील ऑनलाइन केले जातील. त्यामुळे सभासदांना बँकेत येण्याची गरज भासणार नाही. खऱ्या अर्थाने सभासदांचे स्वप्न साकार होणार असल्याचे माजी अध्यक्ष संदीप मोटे यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन दत्ता पाटील कुलट, राजेंद्र शिंदे, विद्युल्लता आढाव, राजकुमार साळवे, सलिमखान पठाण, अर्जुन शिरसाठ, बबन दादा गाडेकर, नारायण पिसे, सुरेश निवडुंगे, संतोष दुसुंगे, गोकूळ कळमकर, राजेंद्र सदगीर, साहेबराव अनाप, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील आदींनी केले आहे.
शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुमाउली सदिच्छा मंडळ, शिक्षक भारती, ऐक्य मंडळ, एकल मंच परिवर्तन मंच या आघाडीच्या माध्यमातून बँकेमध्ये आदर्श कारभार केला जात आहे. कर्ज व्याजदर ७ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे, असे उपाध्यक्ष निर्गुणा बांगर म्हणाल्या.