विविध बँकांच्या संघाशी संबंधित 289.15 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान आज सीबीआयने एका खाजगी बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना अटक केली.
नवी दिल्लीतील एका खाजगी कंपनीविरुद्ध तसेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, संचालक, हमीदार, तसेच इतर काही सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती आणि खाजगी व्यक्तींविरोधात 25 मे 2022 रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा आणि युको बँक अशा बँकांच्या संघाची सुमारे 289.15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी, मेसर्स तिरूपती इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जगमोहन गर्ग यांना अटक करण्यात आली असून त्यांना 13 जुलै 2023 पर्यन्त पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील या बँक संघाने, कर्जदार कंपनीला, 2009 ते 2014 या कालावधीत, नवी दिल्लीत पश्चिम विहार इथे एक हॉटेल आणि इतर व्यावसायिक गाळे बांधण्यासाठी 300 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. मात्र, या आरोपीने, कर्जदात्या बँक संघाला काहीही कल्पना न देता, ह्या कथित हॉटेल आणि व्यावसायिक जागांची अनेक व्यावसायिक/किरकोळ विक्रेते/कार्यालये यांना परस्पर विक्री केली, असा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच या खरेदीदारांकडून मिळालेले पैसे अन्यत्र वळवण्यात आल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी आधी 27.05.2022 रोजी आरोपीशी संबंधित विविध ठिकाणी घालण्यात आलेल्या छाप्यादरम्यान, अशा गैरव्यवहारांशी संबंधित कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. तपासादरम्यान, सीबीआय ने अनेक साक्षीदार, बँकांचे अधिकारी, कर्जदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.