अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य फार मोठं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून माघार घेण्याचे आणि मुलगा जय पवार यांना तिकीट देण्याचे संकेत अजित पवार यांनी दिलेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील लढतीत पराभव झाला आणि आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लढण्यात रस नाही, असं वक्तव्यच अजित पवार यांनी केलं.
पुण्यामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांना जय पवार यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्ते मागणी करत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी या प्रश्नाचे उत्तर देत असताना ते म्हणाले, “शेवटी लोकशाही आहे. मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी तिथे सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे. जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू.”