बारामतीत आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य चंद्रकांत दादांनी केलं होतं. त्यावर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांचं ते विधान आपल्याला महागात गेलं. बारामतीत येवून शरद पवारांना पाडू, हे बारामतीकरांना आवडलेलं नाही, अशी जाहीर कबुली त्यांनी दिली आहे.
बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा जवळपास दीड लाख मताधिक्यांनी विजय झाला आहे. तर सुनेत्रा पवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने राज्यात लढवलेल्या चार पैकी रायगड वगळता ३ जागांवर पराभवाला सामोरं जावं लागलं. बारामतीला पराभव अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण पक्षफूटीनंतर त्यांचीही पहिलीचं निवडणूक होती आणि येत्या काही महिन्यात विधारसभेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत याचा परिणाम जाणवू शकतो.
लोकसभा निकालानंतर अजित पवार प्रसारमाध्यमासमोर आले नव्हते. एनडीएच्या दिल्लीतील बैठकीलाही ते गेले नाहीत. दोन दिवसांनंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभा निडणुकीच्या निकालावरील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचीही मुंद्दा उपस्थित झाला. बारामतीकरांनी आपल्याला भरभरून पाठिंबा दिला. मात्र यावेळी आम्ही कुठे कमी पडलो माहिती नाही. तरीही जनतेचा कौल स्वीकारावा लागतो. विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचं तयारी सुरू आहे. महायुतीतील प्रमुखाशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले.