आमच्याच कुटुंबीयांपैकी किंवा मला माहीत नाही कोणता चेहरा माझ्या विरोधात उभा राहणार आहे. लोकशाहीमध्ये कोणी तरी माझ्या विरोधात लढलेच पाहिजे, तर त्या निवडणुकीमध्ये मजा आहे. तीन वेळा भाजप उमेदवाराविरोधात लढून मी जिंकले असून, आता चौथ्यांदा माझ्या विरोधात लढणाऱ्या उमेदवाराचे स्वागतच करते. काॅपी करून उत्तीर्ण होण्यापेक्षा गुणवत्तेवर उत्तीर्ण होण्यामध्ये मजा आहे, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी मांडली.
बारामती येथील माळेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. बारामती लोकसभेला उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात ‘ही चर्चा कोण करते हे तुम्हाला माहीत आहे’, अशी सावध भूमिका सुळे यांनी घेतली. आमच्या कुटुंबात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीची अदृश्य शक्ती मिठाचा खडा टाकते, अशी टिप्पणी त्यांनी केली.