महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार बीड मधून पंकजा मुंडेंच्या विरोधात उतरणार, याची चर्चा रंगली आहे. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नीचं नावंही आघाडीवर आहे.विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, आरक्षण आंदोलन आणि सामाजिक चळवळीत काम करणारे बी. बी जाधव आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची नावं चर्चेत आहेत. पण, पक्षाऐवजी बाहेरचा चेहरा रिंगणात उतरवायचा आणि पक्षाची ताकद मागे उभी करायची, असं गणित शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मांडलं जात आहे. ज्योती मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष जरी महायुतीत असला, तरी अलीकडे महायुतीत असलेल्या घटक पक्षांना दुय्यम वागणूक मिळाली आहे.
साम टीव्ही’शी संवाद साधताना ज्योती मेटे म्हणाल्या, “शरद पवारांशी अद्याप भेट झाली नाही. लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला, तर विजयापर्यंत जाण्यासाठी सगळ्या गोष्टी करणार. शिवसंग्राम नैसर्गिकरित्या महायुतीबरोबर आहे. आगामी काळात ही समीकरण बदलणार की नाही, हे ठामपणे सांगता येणार नाही. पण, पक्षातील वरिष्ठांमध्ये विश्लेषण सुरू आहे.”