वैद्यनाथ कारखान्यावरील जीएसटीच्या कारवाईबद्दल सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या कारवाईबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. कारखान्याची आर्थिक अडचण, यामुळे त्यांच्याकडून होत असलेले प्रयत्न आणि कारखान्यावर ही अडचण का आली, याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
कारखान्यावर जीएसटी आयुक्तालयाने १९ कोटी रुपयांच्या जीएसटीप्रकरणी नोटीस बजावली आहे. यामुळे मुंडे समर्थक चांगलेच संतापले आहेत. फक्त 19 कोटींसाठी आमचे दैवत मुंडे साहेबांचा आत्मा वैद्यनाथ कारखाना बदनाम करत असाल, तर… फक्त दोनच दिवसांत आम्ही मुंडे भक्त लोकवर्गणीतून ती रक्कम तुमच्या थोबाडावर फेकून मारू, अशा आशयाची पोस्ट मुंडे समर्थक असलेल्या अर्जुन ढाकणे यांनी सोशल मीडियावर टाकली. त्यावर अनेकांनी सहमती दर्शविली आहे.
कारण आम्ही ऊसतोड मजुरांनी भगवानगड उभा केलाय, भगवान भक्तिगड, गहिनीनाथ गड उभा केलाय आणि गोपीनाथगडसुद्धा उभा केलाय…आमच्या दैवतांसाठी आम्ही प्रत्येक गावात कोटी दोन कोटी सहज दान देतो… तुमचा माज जिरवण्यासाठी आम्हाला दोन दिवससुद्धा लागणार नाहीत, असे आव्हानदेखील या पोस्टमधून दिली आहे. फक्त आम्ही आदेशाची वाट पाहतोय… तुम्ही सगळ्यांना गृहीत धरून येड्यात काढू शकता, पण आमच्या नादी लागाल…तर तुम्ही परत दुर्बीण लावूनसुद्धा दिसणार नाहीत, असा गर्भित इशाराही देण्यात आलाय. आता आगीत हात घातलाचा आहे तर परिणामांनाही तयार राहा, असे आव्हान दिले आहे.