पदोन्नतीची प्रक्रिया रखडल्याचे कारण पुढे करत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात धिंगाणा घालणे शिक्षकाच्या अंगलट आले आहे. गैरवर्तवणुकीच्या कारणाने या शिक्षकावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. विजय आमटे असे या शिक्षकाचे नाव आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी सोमवारी ही निलंबनाची कारवाई केली.
आष्टी तालुक्यातील शिक्षक विजय आमटे हे राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते आहेत. त्यांच्या पदोन्नतीच्या प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दाखल आहे. मात्र, त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली होती. आमटे यांनी थेट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन केलेल्या या गैरवर्तनाची दखल संबंधित सीईओ अविनाश पाठक यांनी गंभीरपणे घेतली.