बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बीड बाजार समिती मधील शिवसेनेच्या उपसभापती आणि दोन संचालकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बीड शहरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याची घोषणा केली.
मार्केट समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडी करत सत्ता खेचून आणली होती. त्यामुळेच उबाठा शिवसेनेचा झेंडा बाजार समितीवर फडकला होता. यावेळी उपसभापती श्यामसुंदर पडूळे, धनंजय गुंदेकर, दिपक काळे निवडून आले होते. शिवसेनेमधील खांदेपालट करून नवीन जिल्हा प्रमुख निवडल्याने निष्ठावान शिवसैनिकामधून नाराजी व्यक्त केली जात होती. याचाच एक भाग म्हणून उपसभापती आणि दोन संचालकांनी राजीनामा दिला आहे.