बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या भेटीच्या वेळी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखही त्या ठिकाणी असल्याचं दिसतंय. या भेटीनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली होती. या प्रकरणी धनजंय देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आरोपी आणि पीएसआय साहेब त्या हॉटेलमध्ये होते, त्यावेळी आपणही चहा प्यायला त्या ठिकाणी गेलो होतो असं ते म्हणाले.
बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या आदल्या दिवशी आरोपी सुदर्शन घुले आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील हे केज शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेल भेटले होते. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोघे बोलत असताना चार मिनिटांनी त्या ठिकाणी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आल्याचं दिसतंय. त्यानंतर या तिघांमध्ये काहीतरी चर्चा झाल्याचं व्हिडीओतून स्पष्ट होतंय.
धनंजय देशमुख म्हणाले की, “मी आणि माझा मित्र त्या हॉटेलमध्ये चहासाठी गेलो होतो. त्यानंतर काही वेळाने पीएसआय पाटील साहेब आणि आरोपी त्या ठिकाणी आले. नंतर पीएसआयनी मला बोलावून घेतलं आणि भांडणासंबंधी विचारलं. त्यावर आता ते मिटलं असल्याचं आपण सांगितलं आणि नंतर ते निघून गेले.”
दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता पोलिस या दिशेने तपास करत आहेत. या प्रकरणात सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर इतर चार आरोपी अद्याप फरार आहेत. तसेच या प्रकरणात कारवाईसाठी दिरंगाई करणारे पोलिस निरीक्षक महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तर पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे.