अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांना दिवाळीपूर्वी ऑक्टोंबरचे नियमित वेतन आणि थकीत वेतन, उपदान, वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेच्या शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी अशोक कडूस व वेतनपथक अधिक्षक रामदास म्हस्के यांची भेट घेऊन याबाबत कार्यवाही करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभागचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण उपसंचालकांना निवेदन पाठविले आहे.
शिक्षणाधिकारी कडूस यांनी सप्टेंबर महिन्याचे वेतन त्वरीत देण्याची तरतूद केली जाईल व सर्व कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी मिळण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, प्रा. अजय बारगळ, प्रा. विठ्ठल ढगे, प्रसाद सामलेटी, घोलप सर, बाळासाहेब चव्हाण, ही.ना. पोपरे, नंदकुमार तोडमल आदी उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा दिवाळी सण यावर्षी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. राज्यातील शासनमान्य अनुदानित व अंशतः अनुदानित शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी सण आनंदाने व समाधानकारक रित्या साजरा करण्यासाठी त्यांच्या हक्काचा आर्थिक लाभ दिवाळीपूर्वी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्टोंबरचे नियमित वेतन 28 ऑक्टोबर पूर्वी अदा करावे, त्याचप्रमाणे थकीत वेतनाची देयके, उपदानाची देयके, वैद्यकीय खर्चाची देयके दिवाळीपूर्वी अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिक्षक, शिक्षकेतरांची दिवाळी गोड होण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निधी उपलब्ध द्यावा. दिवाळी हा सर्वांसाठी महत्त्वाचा सण असून, हा सण सर्व शिक्षक, शिक्षकेतर बांधवांना उत्साहात साजरा करण्यासाठी त्यांच्या हक्काचे नियमित वेतन व देयके दिवाळीपुर्वी मिळण्याची गरज आहे. -बाबासाहेब बोडखे (शहर जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद)