बईतल्या मुलुंड भागात एका मराठी महिलेला भाड्याने घर देण्यासाठी नाकारण्यात आले. यावरुन मोठा संताप व्यक्त केला जात असून सर्वच स्तरावरुन प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. मराठी म्हणून मलाही मुंबईत घर नाकारले होते, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
पंकजा मुंडेंनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये हा खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी मुलुंडमधील प्रकाराचा संदर्भ देत आपल्यासारख्या व्यक्तीलाही हा अनुभव आल्याचे म्हणताना हे फार दुर्देवी असल्याचेही म्हटले आहे.
शासकीय बंगला सोडल्यानंतर जेव्हा मुंबईत मी घर शोधायला गेले, तेव्हा मला देखील मराठी म्हणून घर नाकारण्यात आले होते, असा अनुभव पंकजा मुंडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत असे प्रकार घडत आहेत, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जेव्हा मी मुंबईत घर शोधत होते, तेव्हा मलाही असा अनुभव आला. मराठी माणसांना (Mumbai News) आम्ही जागा देत नाही हे मीही ऐकले आहे, याचा पुनरुच्चारदेखील देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून मन खिन्न होते. मराठी म्हणून जागा नाकारल्यानंतर त्या तरुणीने जो व्हिडीओ टाकला, तो संताप आणणारा आहे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
मराठी असल्याच्या मुद्द्यावरुन घर नाकारले जाण्यासंदर्भात बोलताना पंकजा मुंडेंनी, “मी कोणत्याही एका भाषेची किंवा गोष्टीची बाजू घेत नाही कारण मुंबईच सौंदर्य हे प्रत्येक भाषेने, प्रत्येक जातीने आणि प्रत्येक धर्माने नटलेले आहे. ही राजकीय नसून आपल्या देशाची आर्थिक राजधानी असल्याने इथे सर्वांचे स्वागतच आहे.
पण आम्ही यांना घर देत नाही असे काही इमारतींमध्ये बोलत असतील तर हे फार दुर्देवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला हे फार दुर्देवी आहे. या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये दुसऱ्या राज्यातील लोकांना, कोणत्याही जातीच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची आवश्यकता काय? हा माझा प्रश्न आहे,” असे म्हटले आहे