भंडारा: ग्रामसेवकाच्या विरोधात असलेला आक्षेप हटविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या साकोली पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. खिलेंद्र देवरलाल टेंभरे (वय ५३) असे लाचखोर विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार हे ग्रामसेवक आहेत. ते साकोली तालुक्यातील किन्ही(मोखे) ग्रामपंचायत येथे कार्यरत असताना २०१८-१९ मध्ये रस्ता डांबरीकरणाच्या कामासाठी १५० टिन डांबर हे ३ हजार रुपये प्रति टिन या दराने निविदा मागवून ग्रामपंचायतव्दारे खरेदी करण्यात आले होते़ २०२३ मध्ये किन्ही ग्रामपंचायतचे ऑडिट झाले़ रिपोर्टमध्ये डांबर खरेदीबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता़. विस्तार अधिकारी खिलेंद्र टेंभरे यांनी तक्रारदार ग्रामसेवक यांना रस्ता डांबरीकरणाचे कामामध्ये मंजूर दरापेक्षा ३ लाख रुपये जास्त प्रदान केल्याने ३ लाख रुपयाची वसूली तुमच्याकडून केली जाणार, असे सांगितले. सदरची वसुली त्यांच्याकडून होऊ द्यायची नसेल आणि जिल्हा परिषदेस ३ लाख रुपये वसुलीबाबतचा अहवाल न पाठवता, आक्षेपाचा निपटारा करुन तसा अहवाल पाठवायचा असेल तर त्या मोबदल्यात विस्तार अधिकारी टेंभरे यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी गेली़.
तक्रारदार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करून सापळा रचला़ विस्तार अधिकारी खिलेंद्र टेंभरे यांनी १० हजार रुपये लाच तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्वीकारले़ त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडले.