भंडारा जिल्हा: मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक राकेश वैद्य याने ऑनलाइन जुगार खेळण्याच्या नादात चक्क 31 लाख रूपयांची चोरी केली. यासाठी सरपंच व खंडविकास अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतील विविध खात्यातून पैशाची उचल केली. प्रकरणी 5 सदस्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली. गैरप्रकारात सरपंच, उपसरपंच, खंडविकास अधिकारी यांच्या सहभागाचा संशय व्यक्त करीत फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
राकेश वैद्य यास दोन वर्षांपासून ऑनलाइन जुगार खेळण्याचा नाद जडला होता. जुगार खेळण्यासाठी त्याने सन 2022 पासून बनावट स्वाक्षरी करून पैशाची उचल करण्याचा गोरखधंदा चालविला होता. ग्रामसेवकाचा हा गैरप्रकार सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांना माहिती न देता सुरू होता. अनेकदा सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी पासबुक मागितले असता घरी आहे, नंतर दाखवतो, असे बोलून वेळ मारून नेत होता. दरम्यान साईबाबा मंदिर आवार भिंतीची रक्कम सामान्य फंडात जमा होती. त्या बांधकामाचे चेक साहित्य पुरवठाधारकाने बँकेत लावला असता तो बाउन्स झाला अन् गैरप्रकार उजेडात आला.
आता हा प्रकार ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी याची तक्रार दिली असून तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपी ग्रामसेवकांना अटक करण्याची मागणी केली आहे.