Monday, September 16, 2024

भंडारदरा…पाऊस पर्यटकांचा आणि पाऊस स्थानिकांचा…..हेरंब कुलकर्णी यांची उद्बोधक पोस्ट

त्यांचा पाऊस – आमचा पाऊस : एक वेदना (हेरंब कुलकर्णी )
पाउस धुवांधार कोसळतो आहे.सगळी धरणे वेगाने भरत आहेत.पावसाळी पर्यटनाला उधाण आले आहे.फेसबुकवर या ओल्याचिंब फोटोंचा खच पडलाय. शहरी भागाला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरल्यामुळे शहरी माणसे खुश आहेत..धरणे भरताना धरणाच्या खालच्या लाभक्षेत्रातील माणसे क्रिकेटचा स्कोर बघावा तसे रोज किती पाणी वाढते ते बघत असतात आणि एकदा धरण भरले की ते सेलिब्रेट करायला धरणाकडे धबधब्याकडे धाव घेतात…कोसळणारा पाउस ,धबधबे आणि हातातील फेसाळती बिअर एकमेकात मिक्स होऊन जाते..
पण ही धरणे अवघ्या पंधरा दिवसात इतकी पटकन भरताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसात तिथे राहणाऱ्या आदिवासी गरिबांच्या जगण्याचे काय होत असेल ? याचा विचार तरी मनात येतो का ? धरणाच्या फेसाळत्या पाण्याबरोबर वाहत आलेले त्यांचे अश्रू धरणाच्या लाभक्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या लक्षात तरी येतात का ?
जवळपास सर्वच धरणाचे पाणलोट क्षेत्र हे दुर्गम भागात असते. तो पहाडी आणि जंगली भाग असतो. त्या परिसरात आदिवासी किंवा शेतकरी कष्टकरी लोक राहत असतात. पाउस जेव्हा नियमित असतो तेव्हा हळूहळू धरण भरते पण जेव्हा एखादे धरण अवघ्या काही दिवसात मुदतीआधी भरते तेव्हा त्या पाणलोट क्षेत्रात किती भयावह स्थिती असते याची कल्पना करता येणार नाही पण तो कधी चर्चेचा विषय होत नाही..
मी ज्या अकोले तालुक्यात राहतो .त्या तालुक्यात भंडारदरा धरण आहे. या धरणाची क्षमता ११ टीएमसी आहे. दरवर्षी हे धरण १५ ओगस्ट ला भरते पण यावर्षी ते १५ दिवस अगोदर भरले आहे..ज्या आदिवासी पाड्यातून हे पाणी या धरणात येते त्यांची अवस्था आम्ही बघतो ती स्थिती जास्त पाउस झाल्याने अधिकच विदारक होते.
त्यांची घरे काही आपल्यासारखी बंगल्याची सिमेंटची नसतात त्यामुळे पावसात चहा घेत टीव्ही वर राजकारणाच्या बातम्या बघत निवांत ते राहू शकत नाहीत. आधीच त्यांचे घर झोपडीवजा असते. इतक्या वेगवान आक्रमक पावसात ती घरे नीट टिकाव धरत नाहीत. घरे गळत असतात. जनावरेही सततच्या थंडीत काकडून जातात त्यामुळे कधीकधी थंडीत मरतात. इतक्या पावसात चाराही आणता येत नाही त्यामुळे अनेकदा चांगला गोठा नसेल तर जनावरांना घरात आत घ्यावे लागते. एवढ्या छोट्या जागेत माणसे आणि जनावरे एकत्र राहतात. त्या दाटीत ते कसे राहत असतील ..?

पुन्हा पाउस एकदा सुरु झाला की वादळात वीज खंडित होते .अगदी महिना महिना वीज नसते अशी स्थिती अनेक पाड्यांवर असते. वीज नसल्याने जवळच्या गिरणीत धान्य दळून मिळायला अडचण होते. अंधारात महिनाभर ही माणसे राहतात ..मोबाईल चार्ज होणे तर दूरच.
भात लावणी होते पण या तीव्र पावसात इतर रोजगार बंद होतात..घरात साठवणूक तरी या गरीब माणसांची किती असणार ? घरातून बाहेर निघणे मुश्कील होते. लाकूडफाटा गोळा करायला ही जाता येत नाही अशी बिकट स्थिती ….
पाउस जर अतितीव्र असेल जर शेतीची मातीही वाहून जाते. ती थांबवणे आव्हान असते. आमच्या तालुक्यात एकदा एका शेतात डोंगर कोसळला आणि ती शेतीच करणे मुश्कील झाले ..दु:खाचा डोंगर कोसळतो म्हणजे काय ? याचा प्रत्यय त्या लोकांना आला असेल..
इकडे धरण भरण्याचा जल्लोष सुरु असताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील माणसे अशा रोजच्या जगण्याच्या प्रश्नाशी झगडत असतात…
याच माणसांच्या पूर्वजांनी जमिनी या धरणासाठी दिलेल्या असतात ,यांचेच पूर्वज मजूर म्हणून या धरणावर मजूर म्हणून राबलेले असतात आणि आज धरण भरताना त्या पावसाची किंमत हीच माणसे चुकवत असतात …या माणसांना धरण काय देते ? पुनर्वसन कायदे आज आले पण फार पूर्वी बांधलेल्या धरणात ज्यांचे सर्वस्व गेले ते सर्वहारा आहेत…. नर्मदा जन आंदोलनात पुनर्वसन कसे होते ते किती फसवे असते आणि सरकार अगदी न्यायालयात सुद्धा किती धडधडीत खोटे बोलते हे आपण बघितले आहे ..मेधा पाटकर सारख्या एका प्रतिभावंत व्यक्तीचे आयुष्य खर्ची पडले तरी अजूनही प्रश्न त्याच गर्तेत फिरताना बघतो आहोत ..
सर्वात विदारक काळा विनोद हा असतो की उन्हाळ्यात यातील अनेक पाड्यावर पाणी टंचाई असते आणि हे लोक पाण्यासाठी वणवण फिरतात
ही सारी वेदना दया पवार यांच्या कवितेत अगदी तंतोतंत उतरली आहे ..आमच्या तालुक्यात भर पावसात भिजणाऱ्या केविलवाण्या झोपड्या बघितल्या की ही कविता दया यांनी या पाड्यावर लिहिली का ? असे प्रश्न पडतात …
बाई मी धरण धरण बांधते
माझे मरण मरण कांडते
पुढे दया म्हणतात
वेल मांडवाला चढे
माझ्या घामाचे गं आळे…
माझ्या अंगणी अंगणी पाचोळा ग पडे….
खरेच या माणसांना काय मिळते ?
आज पुणे शहराला १७ टीएमसी पाणी लागते. त्या पाण्यावर ही समृद्धी उभी आहे . त्या पाण्याचा माणसे बेसुमार वापर करतात, स्विमिंग टंक पासून सारे काही मनोरंजन उभे राहताना त्या धरणांची आणि पावसाची भयावह किंमत चुकवणाऱ्या माणसांना आपण व्यवस्था म्हणून आपण काय दिले याचा आपण कधीतरी या आनंदात विचार करतो का ? किमान त्याबद्दल आनंद साजरे करताना संवेदना तरी ?
हे दोन जगातील अंतर इतके टोकाचे आहे की या जल्लोषात त्यांचे हुंकार पोहोचत सुद्धा नाहीत.
एकदा मी असाच पावसाळ्यात आमच्या भंडारदरा परिसरात गेलो होतो. पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पाउस थोडावेळ थांबला होता.. एक मुंबईची पर्यटक महिला वाहणाऱ्या छोट्या धबधब्यात पाय टाकून पाउस कधी सुरु होईल म्हणून आकाशाकडे आशेने बघत होती आणि पाउस थांबला म्हणून एक आदिवासी महिला घाईने लाकडे जळण म्हणून गोळा करत होती ..कडेचा हा जल्लोष तिच्या गावीही नव्हता …..माझ्या मनात आले दोघीही महिला पण दोघीचे भावविश्व किती वेगळे…
एक पाउस येण्याची वाट बघणारी आणि दुसरी पाउस थांबण्यासाठी वाट बघणारी
पावसातही भारत इंडिया असतो तर ….
धरणे यावर्षी लवकर भरली …कदाचित त्यात या पाणलोट क्षेत्रातील माणसांचे अश्रू असल्याने तर पाणी वाढले नसेल ….?

हेरंब कुलकर्णी

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles