आमदार भरत गोगावले म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद नाकारलं आहे. निवडणुकीत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट धरणं आमच्या स्वभावात बसत नाही. म्हणूनच एकनाथ शिंदे आणि हसत हसत मुख्यमंत्रीपद नाकारलं. तसेच ते म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होत असेल तर त्या मुख्यमंत्र्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल. आम्ही भाजपच्या निर्णयाचं समर्थन करू’. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून होत असलेल्या चर्चेला व प्रश्नांना काहीच अर्थ उरत नाही. आम्ही गृहमंत्रीपद मागितल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमं दाखवत आहेत”.
महाडचे आमदार म्हणाले, “मी परवा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होतो. आमच्याबरोबर आमचे इतरही नेते, मंत्री, आमदार होते. तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले, ‘मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो’. त्यावर आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही सत्तेच्या बाहेर राहायचं नाही. तुम्ही सत्तेत राहूनच काम करावं”.