शिवसेनेतील बंडखोरीनंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं. यात पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं इथपासून तर बंडखोर आमदार कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई करायची यावर सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभाअध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितले. यानंतर आता विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होत आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या सुनावणीबाबत मोठी मागणी केली आहे. ते शनिवारी (२३ सप्टेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “अपात्र आमदारांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जेव्हा खटले चालतात त्यावेळी ते लाईव्ह सगळ्यांना बघायला मिळतं. आज महाराष्ट्रात एवढा मोठा घटनाक्रम झाला आहे. घटनातज्ज्ञही यावर गांभीर्याने लक्ष ठेऊन आहेत. महाराष्ट्राचंही या सुनावणीकडे लक्ष आहे. अशा परिस्थितीत विधानसभा अध्यक्ष जी सुनावणी करणार आहेत ती लाईव्ह करावी.”
“विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लाईव्ह करावी. जेणेकरून काय चाललं आहे हे लोकांना समजेल आणि सत्य परिस्थिती समोर येईल. कोण काय बाजू मांडतोय हेही समजेल. म्हणून आम्ही या सुनावणीचं प्रक्षेपण लाईव्ह करावं अशी मागणी केली आहे,” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.