नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यांच्या मागण्या व समस्यांवर जिल्हाधिका-यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आज पासून नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपुर्वी केंद्र सरकारने कांद्याचे दर वाढत असतांना निर्यात मुल्यात ४० टक्के वाढ केली होती. या निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यात अनेक संघटनांनी बंद पुकारला त्याला अप्रत्यक्षपणे व्यापाऱ्यांनी साथ दिली होती.
त्यानंतर केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत २४२० रुपये कांदा खरेदीची घोषणा केली. बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु होत नाही तोच पुन्हा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बंद पुकारला आहे.
कांद्याचे निर्यातमूल्य तत्काळ रद्द करावे, नाफेड व एनसीसीएफ मार्फत कांद्याची खरेदी मार्केट मध्ये करुन त्याची विक्री रेशनमार्फत करावी, केंद्र व राज्य शासनाला कांद्याचे भाव नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापारावर सरसकट पाच टक्के सबसिडी व देशातर्गत वाहतूकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी हा बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.
व्यापाऱ्यांच्या या बंदमुळे सणाच्या काळात मात्र शेतक-यांकडे शिल्लक असलेला कांदा मात्र चाळीतच पडून राहणार आहे. दरम्यान दोन दिवसात या प्रश्नावर पुन्हा व्यापा-यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतात, याकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे.