भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाचं शिर्डीत आज महाअधिवेशन पार पडलं. या अधिवेशनासाठी राज्यातील भाजपाचे सर्व दिग्गज नेते आणि राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते. भाजपाचं हे अधिवेशन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं मानलं जातं. या अधिवेशनातून भाजपाने आगामी महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. याच अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचा सर्वोच्च न्यायालयातील निर्णय झाला तर पुढील तीन-चार महिन्यांत या निवडणुका होतील’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“आपल्याला विकासाची कामे करायची आहेत. भारतीय जनता पक्षाला विधानसभेत मिळालेला महाविजय जनसामान्यांच्या जिवनात परिवर्तन आणण्यासाठी आहे. तसेच एक पारदर्शी आणि प्रामाणिकतेतून चालणारं सरकार अशी प्रतिमा आपल्या सरकारची आणि त्या सरकारच्या पाठिमागे उभी असलेल्या संघटनेची राहिली पाहिजे. जर अशा दोन्ही प्रतिमा आपण तयार केल्या निश्चित आपल्याला वारंवार मोठा विजय मिळेल”, असं फडणवीसांनी म्हटलं.
“येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. माझा असा अंदाज आहे की पुढच्या तीन-चार महिन्यांत अर्थात सर्वोच्च न्यायालयात तो निर्णय झाला तर कारण तो निर्णय शेवटच्या टप्यांत आहे. त्यामुळे जर सर्वोच्च न्यायालयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत या निवडणुका होतील. या निवडणुकींची तयारी आपल्याला करायची आहे. तसा महाविजय महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीत मिळवला तसाच महाविजय आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवाचा आहे. त्यासाठी आपण सज्ज राहावं”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.