बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना नितीश कुमार पुन्हा एकदा आरजेडीला सोडून भाजपाशी हातमिळवणी करणार आहेत, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बिहार विधानसभेत २४३ आमदारांपैकी केवळ ४५ आमदार आणि तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष असूनदेखील नितीश कुमार एकाच टर्ममध्ये तिसऱ्यांदा किंगमेकरची भूमिका निभावताना दिसत आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद तर भाजपाच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाले तर एकाच टर्ममध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम नितीश कुमार रचतील.
२०१३ पासून ते २०२३ या दहा वर्षांत नितीश कुमार यांनी दोन वेळा भाजपा आणि आरजेडीशी युती आणि आघाडी केली. त्यामुळे दोन्ही पक्षांनी त्यांच्यावर प्रखर टीका केलेली आहे. भाजपाने तर त्यांना पलटू कुमार असे नाव दिले होते. मात्र तोच भाजपा आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांना नवव्यांदा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मदत करणार आहे.