मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : देशात मोदी यांच्या गॅरंटीच्या लाटेने सर्व पक्ष पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळणार आहेत आणि पुढील काळात कॉंग्रेसमध्ये इतकी मोठी फूट पडणार आहे की त्यांना उमेदवार उभारायला माणसं मिळणार नसल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करीत आहेत. याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी म्हटले की चांगली गोष्ट आहे की कॉंग्रेसचे लोक वेगवेगळ्या पक्षात जात आहेत. मागे मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. परवा शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी भाजपात आले. जस जसे मोदींचे वादळ आणि मोदींची गॅरंटी महाराष्ट्रात येईल तसे सर्व पक्ष पत्त्यांसारखे कोसळतील असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय त्याबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे यांना येत्या काळात गावातही जनता फिरु देणार नाही. त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. महाराष्ट्रातील जनता त्यांना मतदानातून धडा शिकवेल असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.