भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला. पण या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
भाजपकडून जो व्हिडीओ ट्वीट करण्यात आला होता त्यामध्ये देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ ही कविता बोलताना दिसत होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवा भूकंप घडून येणार का? देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या. याबाबत चर्चांना प्रचंड उधाण आल्यानंतर अवघ्या काही वेळात भाजपला तो व्हिडीओ डिलीट करावा लागला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणावर टीका केली आहे. “अवघ्या 55 मिनिटात ट्वीट डिलीट झालं. दिल्लीवरून फोन आला का? असं काय घडलं की ट्विट डिलीट करावं लागलं? देवेंद्र फडणवीसांच्या टीमकडून मी कसा पर्याय आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र ते राज्यातील परिस्थिती हाताळायला नापास ठरले आहेत. ट्वीट डिलीट झालं हे राज्यातील भाजपला आवडलेलं नसावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शह-कटशहाचं राजकारण चाललं आहे. टॉम अँड जेरीचा खेळ चालला आहे.