दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार संदर्भात वक्तव्य केले होते. मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाहेर येताच आपल्याला उलटी होते, असे विधान त्यांनी केले होते. त्या प्रकरणावरुन वादळ निर्माण झाल्यानंतर आता भाजप प्रवक्त गणेश हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. अजित पवार यांच्यासोबत युती आमचे दुर्देव आहे, असे हाके म्हणाले. त्यावरुन महायुतीत सर्वकाही सुरळीत नाही, असे समोर आले आहे.
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये भाजपाचे पदाधिकारी मेळाव्यात अजित पवार यांच्या विरोधात सूर उमटले. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला मदत करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या सोबत झालेली युती हे त्यांचे आणि आमचे दुर्दैव आहे. त्यांच्यासोबत झालेली युती त्यांना पटली नाही आणि आम्हाला पटली नाही. असंगशी संग म्हणतात, तसे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादीने लोकसभेत युतीचा धर्म पाळला का? आमचा खासदाराचे काम त्यांनी केले नाही. आमच्या खासदारास त्यांनी पाडले. आता ते आम्हाला महायुतीचा धर्म विचारत, आहेत, असे हाके म्हणाले.