विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांचे विविध मतदारसंघात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून कामांचा आढावा आणि उमेदवारांची चापणी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून केली जात आहे. अशातच भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर आज हर्षवर्धन पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी अजित पवार गटावर अप्रत्यक्ष टीका केली. “महायुतीमधील एक पक्ष उमेदवारी जाहीर कसा करतो?”, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
“आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपआपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. एकदा आमचा दौरा होऊ द्या. त्यानंतर मग सर्व प्रमुख लोकांशी संवाद साधून विचारविनिमय करावा लागेल. मी एकटा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. शेवटी सध्याचा काळ असा आहे की, जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्या पद्धतीने पुढे चर्चा करू”, असं सूचक विधानाही हर्षवर्धन पाटील यांनी केलं.
“महायुती म्हटल्यानंतर तीन पक्ष आले. आता महायुतीमधील तीन पक्षांपैकी एक पक्ष तर काही मतदारसंघात जाऊन उमेदवारच जाहीर करायला लागला आहे. आमच्या मतदारसंघातही त्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं की आम्हीच पुन्हा लढवणार वैगेरे-वैगेरे…, असं बरंच काही त्यांनी सांगितलं. मग महायुतीमधील जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय झाले आहेत की नाही? नेमकं काय ठरलं आहे? याबाबत आम्हालाही काही समजायला मार्ग नाही. त्यामुळे या विषयांवर आम्ही वरिष्ठ नेत्यांशी एकदा बोलणार आहे”, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्ष अजित पवार गटावर टीका केली.