राज्यातील राजकारणात काहीही होऊ शकते, ही प्रतिक्रिया सर्वसामान्यांची झाली आहे. कारण २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला जनतेने निवडून दिले. परंतु सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेस पक्ष आला. त्यानंतर वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत आपल्या ४० आमदारांसह भाजपची साथ धरली. आता आठ, दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले अन् त्यांच्या गटातील नऊ आमदारांसह सत्तेत आले. आता भाजपसोबत येताना अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते का? यासंदर्भात भाजप नेत्याने दावा केला आहे.
भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी मोठं विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे विधान संजय काकडे यांनी केले आहे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर काय ठरलंय ते पाहावं लागणार आहे. परंतु भाजपसोबत आल्याचा अजित पवार यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.