उत्तर भारतात भाजपच्या संख्याबळात फारसा फरक पडणार नाही. दक्षिण, ईशान्य आणि पूर्वेकडील राज्यांमधील जागांमध्ये वाढ होणार आहे. भाजप ३४० ते ३५५ जागा जिंकेल. गेल्या वेळी मित्र पक्षांनी ७७ जागा जिंकल्या होत्या. मित्र पक्ष तेवढ्याच जागा जिंकतील. यामुळे आमचे चारशे पारचे ध्येय साध्य होण्यात अडचण येणार नाही, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात सांगितले.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली त्याच दिवशी रात्री आम्ही बिहारमधील नेत्यांबरोबर चर्चा करून मतदानाच्या तारखांच्या दिवशी किती विवाहसोहळे आहेत याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. तसा आढावा घेतल्यावर ६० ते ६५ विवाहसोहळे त्याच दिवशी असल्याचे आढळले. ज्यांच्या घरी विवाहसोहळे होते त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली. त्यानुसार ६५ लग्न मुहुर्त बदलण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मतदारसंघात पर्यटनासाठी जाणाऱ्या सुमारे ६८ हजार जणांनी बाहेर जाण्याच्या तारखा बदलल्याचेही तावडे यांनी सांगितले.