नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील अनेक जागा गमावल्या. त्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन १२५’ अंतर्गत भाजपने विशेष रणनीती आखली आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी ‘मिशन १२५’ अंतर्गत आगामी निवडणुकीसाठी नव्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील ५० जागा निश्चित केल्या आहेत. या ५० जागांवर पक्षाचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, असा भाजपचा दावा आहे. तसेच ७५ जागांसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे.
भाजपने ७५ जागा निवडून आणण्यासाठी राज्यातील बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक बड्या नेत्यांवर विधानसभेच्या ७-८ मतदारसंघाची जबाबदारी देण्याचं नियोजन आखलं आहे. तसेच त्यांना या मतदारसंघाचा अहवाल नेतृत्वाकडे देण्यास सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील या नेत्यांनी त्या त्या मतदारसंघाचे दौरे सुरु केल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपने १२५ जागा निश्चित केल्याने महायुतीतील इतर घटक पक्ष काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्षाकडून हेवेदावे सुरु आहेत. तसेच जागावाटपाच्या चर्चेलाही सुरुवात झालेली नाही. त्या आधीच भाजपने राज्यातील काही जागा निश्चित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.