संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असून त्यानिमित्ताने भाजपाच्या खासदारांची बैठक सपन्न झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी येताच, सर्व खासदारांनी उभे राहून घोषणाबाजी करत, टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदींचा सत्कार केला.
तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळविल्यानंतर ही पहिलीच संसदीय सदस्यांची बैठक आहे. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, तीन राज्यात मिळालेल्या विजयामुळे हे निश्चित झाले की, आपल्या कामाच्या आधारावर आपण पुन्हा सत्ता मिळवू शकतो.
द इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या माहितीच्या आधारे सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदारांना ‘मोदीजी’ न बोलण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “लोक मला मोदी या नावाने ओळखतात. त्यामुळे खासदारांनी मला मोदीजी किंवा आदरणीय मोदीजी म्हणून संबोधित करू नये. मी आजही पक्षाचा एक छोट कार्यकर्ता आहे. मी जनतेच्याच कुटुंबाचा एक भाग आहे, असे मी समजतो. लोकांना मोदी म्हणून मी जवळचा वाटतो, त्यामुळे माझ्या नावापुढे श्री किंवा आदरणीय असे काही लावू नका.”