लोकसभेनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. अशातच शनिवारी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप १७० ते १८० जागा लढवाव्यात, अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटाची चांगलीच धाकधूक वाढली आहे.
याआधीच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विधानसभेच्या १६४ जागा लढविल्या होत्या. यातील १०५ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, तरीही भाजपला मुख्यमंत्रीपदापासून दूर राहावे लागले. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळावं अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे.