भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. “अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. तसेच “सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक”, अशीही टीका पडळकर यांनी केलीय. गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील वाद हा नवा नाही.
गोपीचंद पडळकर यांनी याआधीदेखील शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलीय. पण आता अजित पवार सत्तेत आहेत. असं असतानाही त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे पडळकरांच्या टीकेवरुन नवा वाद निर्माण होण्यची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. पण त्यांनी अजित पवार यांना पत्र पाठवलं नाही. याबाबत गोपीचंद पडळकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली.
“अजित पवार यांची भावना आमच्या विषयी स्वच्छ नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यांना आम्ही मानत नाहीत. त्यामुळे मी त्यांना आम्ही कधी पत्र दिलं नाही आणि पुढेही पत्र देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्यांना मी पत्र दिलंय”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली. “ही लबाड लांडग्याची लेक बोलतोय. त्यावर फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तर तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या. लोकांच्या चपल्या फाटल्या. तुमच्या बापाने, तुम्ही, तुमच्या भावाने, पुतण्याने कुणीच तिकडे बघितलं नाही”, असा घणाघात पडळकर यांनी केला.