लेक वियाना हिला घेऊन भाजप आमदार नमिता मुंदडा या विधिमंडळात आल्या. यावेळी त्यांनी पाच वर्षांआधीची आठवण सांगितली. तसंच लेकीसोबतचे विधिमंडळातील फोटोही शेअर केलेत. वाचा आमदार नमिता मुंदडा यांची पोस्ट…आई… तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल तर आईपण तुम्हाला अधिक बळ देतं. एखादी स्त्री जर आई झाली तर ती अधिक ताकदीने संकटांना सामोरी जाते. तिचं आईपण कधीच तिच्या कामाच्या आड येत नाही, हे अनेक महिलांनी सिद्ध केलं आहे. राजकीय जीवनात वावरत असताना नेत्यांच्या पाठीमागे कामाचा ताण असतो. लोकांच्या भेटीगाठी असतात. अशात कुटुंबाला वेळ देणं तसं पाहिलं तर तारेवरची कसरत असते. पण जर तुम्ही आई असाल तर मात्र आपल्या मुलांसाठी तुम्ही वेळ काढताच…. बीडमधील केडच्या आमदार नमिता मुंदडा या लाडकी लेक वियानाला घेऊन अधिवेशनाला आल्या होत्या. याबद्दल त्यांनी फेसबुकवर भावूक पोस्ट शेअर केलीय.
पाच वर्षांपूर्वीची ती सकाळ अजूनही माझ्या मनात कोरलेली आहे. गर्भवती अवस्थेत, हृदयात असंख्य स्वप्नं, भीती आणि अनेक जबाबदाऱ्या घेऊन मी पहिल्यांदा विधिमंडळाच्या दाराशी उभी होते. माझ्या पोटात वाढत असलेल्या छोट्या जीवाने मला त्या क्षणाला आधार दिला, जणू तिच्या स्पंदनातून ती म्हणत होती,”आई, तू हे करू शकतेस !”