हरियाणा विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरी अद्याप अनेक पक्षांचं तिकीटवाटप पूर्ण झालेलं नाही. हरियाणा भाजपाने नुकतीच त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी आल्यानंतर तिकीट मिळालेले उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसू लागला आहे. तर ज्या इच्छूक उमेदवारांचं व आमदारांचं तिकीट कापलं गेलं आहे त्यांच्या घरी निराशेचं वातावरण आहे. दरम्यान, भाजपाच्या एका आमदाराचं विधानसभेचं तिकीट कापल्यामुळे त्यान टाहो फोडला आहे. तिकीट कापल्यामुळे हा आमदार मोठमोठ्याने रडत असल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
भाजपाने आमदार शशी रंजन परमार यांना यावेळी (हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४) तिकीट दिलं नाही, त्यामुळे शशी परमार मोठमोठ्याने रडू लागले. ते भिवानी जिल्ह्यातील तोशाम मतदरसंघाचे आमदार आहेत. त्यांना यावेळी देखील तोशाम किंवा भिवानी मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी चर्चा होती. मात्र, भाजपाने भिवानी मतदारसंघातून घनश्याम सर्राफ व तोशाममधून श्रुती चौधरी यांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे.
भाजपाची विधानसभेच्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये शशी रंजन परमार यांचं नाव नसल्याचं पाहून काही प्रसारमाध्यमांनी परमार यांच्याशी बातचीत केली. यावेळी परमार म्हणाले, “मला वाटत होतं की पक्ष मला तिकीट देईल. पक्ष माझ्या नावाचा विचार करत आहे असं मी लोकांना सांगितलं होतं. आता मी काय करू? हे सगळं माझ्याबरोबरच का होतंय? माझ्याबरोबर पक्षाने जो व्यवहार केलाय ते पाहून मला खूप वेदना होत आहेत. मला कळत नाहीये, पक्षात हे कसले निर्णय घेतले जात आहेत”.