Saturday, October 5, 2024

बीडमध्ये आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण,आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा

जमिनीवर ताबा घेण्याच्या उद्देशाने एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वाळुंज ( ता. आष्टी ) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणात विधान परिषदेचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघाविरुद्ध विनयभंग अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याचा आरोप पीडितेनं तक्रारीत केला आहे. मात्र सदर घटनेची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड जिल्ह्यातील वाळुंज (ता.आष्टी ) येथे दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका महिलेला विवस्त्र करून फिरवल्याची धक्कादायक घटना घडली. ४० वर्षीय महिला पती आणि सुनेसह शेतात काम करत असताना त्याठिकाणी आलेल्या काही लोकांनी त्यांच्या शेतजमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की , रघु कैलास पवार आणि राहुल माणिक जगदाळे या दोघांनी पती आणि सुने समोरच मला विवस्त्र करून विनयभंग केला. प्राजक्ता सुरेश धस या त्याच ठिकाणी आडोश्याला उभे राहून ‘ घाबरू नका , तिला चांगला चोप द्या ‘ असे म्हणत होत्या. पती आणि सून माझ्या दिशेने येत असल्याचे पाहून दोघेही पळाले. त्यावेळी मी रघु पवार याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत होते
प्राजक्ता धस यांनी सोबत आणलेले वीस ते पंचवीस गुंड त्या ठिकाणी जमले होते. पोलीस आल्यामुळे त्यांना आमच्यावर हल्ला करता आला नाही. हा सर्व प्रकार पोलिसांनी सुद्धा पाहिलेला आहे, त्यांच्यासमोरच हे सर्व घडले असून रघु पवार व राहुल जगदाळे यांनी प्राजक्ता धस यांच्या सांगण्यावरून माझा छळ केला. जातिवाचक शिवीगाळ केली. गेल्या ६५ वर्षांपासून सदर शेतजमीन वडिलोपार्जित आमच्याच ताब्यात असून तीन पिढ्यांपासून आम्ही ही जमीन कसत आहोत. त्याची नोंद सातबारावर असतानादेखील प्राजक्ता धस यांनी ही जमीन माझी असल्याचा दावा केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला
आहे.
गेल्या २१ वर्षांपासून मी आमदार पदावर आहे. सार्वजनिक जीवनात आम्ही हे करू शकतो का? सदरील घटना घडली , त्यात मी स्वतःच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्यास सांगितले होते. या प्रकरणातील सत्यता लवकरच बाहेर येणार आहे. कोण चित्रफीत काढत आहे, कोण कोणाला काय सांगत आहे? हे आता समोर येत आहे. मी स्वतः या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी लेखी मागणी केली आहे. चौकशीनंतर सर्व सत्यता समोर येईलच असे सांगत सदरील आरोप खोटा असून राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल झाल्याचे आ. सुरेश धस यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles