भाजपमध्ये येणाऱ्यांचा ओढा अधिक वाढला आहे. अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये येत आहेत. भाजपकडूनही या नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. पण आता प्रवेश देताना चाळणी लावण्यात येणार आहे. यापुढे भाजपमध्ये कुणालाही थेट प्रवेश मिळणार नाही. कुणाला प्रवेश द्यायचा आणि कुणाला नाही हे ठरवण्यासाठी भाजपने एक समितीच स्थापन केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत निर्णय घेण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या परवानगी नंतरच बाहेरच्या पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
भाजपने एकूण 8 जणांची समिती स्थापन केली आहे. आठ जणांमध्ये चार केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव आणि मनसुख मांडविया यांचा समावेश आहे. तर तीन राष्ट्रीय महासचिव म्हणजेच विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनील बंसल यांचाही या समितीत समावेश असणार आहे. याशिवाय समितीत मुख्यमंत्री हेमंत शर्मा यांनाही स्थान देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचा या मुख्य समितीत समावेश झाला आहे. या समितीच्या अंतर्गत प्रत्येक राज्यात एक समिती बनवली जाणार आहे. ती समिती त्या त्या राज्यात इतर नेत्यांच्या भाजपा पक्षप्रवेश बाबत निर्णय घेणार आहे.