भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली. त्यांनी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या सुप्रसिद्ध गाण्याचा सूर लावत “ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला” असं नवं गाणं सादर करत चष्मा लागल्याची माहिती दिली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पूर्वी मला जवळचं नीट दिसत नव्हतं, आता मला चांगलं दिसायला लागेल, असं मिश्किल वक्तव्यही पंकजा मुंडेंनी केलं आहे. या वक्तव्याचे आता राजकीय अर्थ काढले जात आहेत.
पंकजा मुंडे व्हिडीओमध्ये म्हणाल्या, “एक मिनिट सरप्राइज.. ताईला चष्मा लागला.. ताईला चष्मा लागला.. लांबचा चष्मा नाही बरं का.. जवळचा चष्मा आहे. मला जवळचं कमी दिसत होतं वाटतं. ते आता चांगलंच स्पष्ट दिसायला लागेल. चष्म्याचा नंबर कमी आहे. पण मला आता जवळचं स्पष्ट दिसेल. दूरचं तर आधीही चांगलं दिसत होतं आणि आताही चांगलं दिसतंय. कसा वाटतोय चष्मा?”