महाराष्ट्राचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुनगंटीवार म्हणाले, मी नाराज नाही, पक्षाने जो आदेश दिला, जबाबदारी दिली त्याचं मी पालन केलं आहे. मला याची जाणीव आहे की मी विधानसभेत आलो असतो तर अनेक जण अनेक प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मौनं, सर्वार्थ साधनं हे मी मानतो तसंच श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे. संघटनेच्या नव्या आदेशाची वाट पाहतो आहे.
सभागृहाचं आज काहीही काम नाही. मी मंत्री असतो तर सही करावी लागते. तारांकित प्रश्न मांडले जातात. आत्ता काम काही नाही. तारांकीत प्रश्न नाहीत त्यामुळे आलो नाही. या अधिवेशनात औचित्याचे मुद्दे उपस्थित करेन. जनतेचे प्रश्न मांडावेच लागतील. मला मंत्रिमंडळात ज्यांनी घेतलं नाही तेच उत्तर देऊ शकतील की मला मंत्री का केलं नाही. मला काही सांगता येणार नाही. मला मंत्रिमंडळात घेतलं जाणार नाही अशी जाणीव मला कुणी करुन दिली नाही. मी संघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मला प्रमोद महाजन यांचं वाक्य आठवतं आहे पावला-पावलावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम पुढे नेतो तोच खरा कार्यकर्ता. हे वाक्य मी माझ्या मनात जपून ठेवलं आहे. असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. माझं देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि चंद्रशेखर बावनकुळेंशी बोलणं व्हायचं पण मी मंत्रिमंडळात नाही हे काही मला जाणवलं नाही. माझं नाव मंत्रिमंडळात आहे हे सांगण्यात आलं होतं असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मला दोन्ही नेत्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही नाव आहे हेच सांगितलं होतं. असंही मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी स्पष्ट केलं.