विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून येत्या दहा ते पंधरा दिवसात निवडणूक आयोग यासंबंधी पत्रकार परिषद घेत वेळापत्रकाची घोषणा करण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका लागण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार १० ते २० नोव्हेंबर या काळात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजप विधानसभेला १६० जागा लढणार असल्याची माहिती मिळत आहे.
भारतीय जनता पक्षासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुतीचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु भाजपने १६० हून अधिक जागा लढण्याची तयारी केल्याचे समजते. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीत जितक्या जागा लढल्या, तितक्याच जागा लढण्याच्या मानसिकतेत पक्ष आहे. भाजप नेत्यांमध्ये १६४ जागा लढण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
भाजप १६० हून अधिक जागा लढणार असल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या वाट्याला मिळून १२५ ते १३० जागा येण्याची शक्यता आहे. यात अन्य घटकपक्षांनाही सामावून घ्यावे लागणार आहेत. अजितदादा ७० जागांवर ठाम आहेत. तर एकनाथ शिंदेही ८० जागांच्या तयारीत आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन ओढाताण होण्याची शक्यता आहे.