सांगली जिल्ह्यात विरोधी पॅनलच्या उमेदवाराच्या पराभवासाठी काळी जादू केल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर पुण्यातील जुन्नरमधील नारायणगावातही जादूटोणा केल्याची भयंकर घटना उघड झाली आहे.
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडालाय. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत बैठका घेत आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. दुसरीकडे, निवडणूक जिंकण्यासाठी ‘काय पण!’ म्हणून विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. पुण्यातील जुन्नरमधील नारायणगावात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात दोन पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विकासाच्या मुद्द्यावर जोरदार प्रचारही करण्यात आला. काल प्रचार थंडावला आहे. मात्र, एका घटनेने येथील वातावरण गंभीर झालं आहे. नारायणगावातील एका पॅनलच्या उमेदवारांचे फोटो लावून जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे उमेदवार आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी हा प्रकार केल्याचं अनेकांकडून सांगण्यात येत आहे. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीला अंधश्रद्धेची कीड लागली आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. या प्रकाराने ग्रामस्थ धास्तावले आहेत. नारायणगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.